घनदाट लोकवस्तीमधील दुर्घटनांसाठी चार वाहनांची खरेदी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी विभागामध्ये २००० लिटर क्षमतेचे चार स्मॉल वॉटर फायर टेंडर वाहन खरेदी करण्यात आले आहेत. ही चारही वाहने अग्निशमन विभागामध्ये रूजू करून घेण्यासाठी सोमवारी (ता. १७) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
मनपा मुख्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित लोकार्पण समारंभामध्ये उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अग्निशमन सेवा समितीचे सभापती लहुकुमार बेहेते यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतील.
शहरातील जुन्या वस्त्यांमध्ये घनदाट लोकवस्ती व अरूंद रस्ते असल्याने त्या ठिकाणी आगीच्या व इतर दुर्घटना घडल्यास विभागाचे मोठे वाहन घटनास्थळी नेता येत नाही. त्यामुळे दुर्घटनेवर कार्य करण्यात अडचण निर्माण होत असते. अशा ठिकाणी कार्य करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाने २००० लिटर क्षमतेचे चार नग स्मॉल वाटर फायर टेंडर खरेदी केले आहे. या चारही वाहनांच्या चेसीस खरेदी, फेब्रिकेशन खरेदी व फेब्रिकेशन कार्यावर एकूण १,३७,३३,३८८ रूपये खर्च झालेला आहे.