नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालातील (मेयो) अस्थिरोग वॉर्डात मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे वॉर्डातील रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली. यादरम्यान दोन परिचारिकांनी दाखवलेल्या प्रसंगवधाने रुग्णांचा जीव वाचल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सचा पहिल्या माळ्यावर अस्थिरोग विभागाचा वॉर्ड क्र. ३४ आहे. या वॉर्डात निवासी डॉक्टरांसाठी वेगळी खोली आहे. मंगळवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास इन्चार्ज सिस्टर वर्षा विंचूरकर यांना डॉक्टरांच्या खोलीच्या खिडकीतून धूर येताना दिसला. त्यांनी लागलीच वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या दुसऱ्या परिचारिका सरिता नायर यांना याची माहिती दिली. दोघींनी त्या खोलीकडे धाव घेतली. त्यानंतर दोन्ही परिचारिकांनी वॉर्डातील वीजपुरवठा खंडित केला. आगीत पलंगावरील गादीने पेट घेतला होता. शिवाय, रुग्णांना बँडेज बांधण्यासाठी कापूस व इतर साहित्य जळत होते.
परिचारिकांनी बादलीत पाणी घेऊन आगीच्या दिशेने फेकू लागल्या. सतत पाण्याचा मारा केल्याने प्राथमिक स्वरूपात आग विझली. दोन्ही परिचारिकांनी वॉर्डातील सर्व दारे-खिडक्या उघडल्या. याच दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान अग्निशमण उपकरण घेऊन धावत आले. ही आग ‘शॉर्टसर्किट’मुळे लागल्याची माहिती समोर आली आहे.