नागपूर: वर्धा रोडवरील मध्यवर्ती कारागृहामध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. सदर आग ही कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये लागली आहे. दरम्यान अग्निशमन विभागाच्या एकूण ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निग्रस्त गोडाऊनचा वापर कारागृहातील सामान व अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो.
गोडाऊनला लागून असलेल्या बराकमध्ये सुद्धा आग पसरली असून ती विझवण्याचे काम सुरु आहे. या बरॅकमध्ये कोणीही कैदी नव्हता तर फक्त काही सामान ठेवण्यात आले होते.
अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या आतमध्ये प्रवेश करणे शक्य नसल्याने कारागृह इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतींच्या बाजूने बाहेरूनच आगीवर नियंत्रण मिळवले जात असल्याची माहिती मिळाली आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके आणि नरेन्द्र नगर अग्निशमन विभागाचे प्रमुख धर्मराज नकोड घटनास्थळी जातीने हजर आहेत.