मनपा आयुक्तांनी केली नेहरूनगर झोनमध्ये आकस्मिक पाहणी
नागपूर : मालमत्ता कर संकलनात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी नेहरूनगर झोनच्या पाच कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले. बुधवारी (ता.२१) मनपा आयुक्तांनी नेहरूनगर झोनला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त (महसूल) श्री. मिलिंद मेश्राम व सहायक आयुक्त श्री. अशोक पाटील उपस्थित होते. सेवा पंधरवडा अंतर्गत मालमत्ता कर विभागाच्या सेवा नागरिकांना वेळेवर उपलब्ध करणे आवश्यक आहे. सदर कामात या झोनचे पाच कर्मचारी दिरंगाई करतांना निर्दशनास आले.
नेहरूनगर झोनमधील २१ हजार थकबाकीदार यांची रु. 15.92 कोटीची मालमत्ता कराची वसुलीकरीता स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई न केल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी नाराजी दर्शविली. मा.आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे गैरजबाबदार कर्मचारी जवाहर धोंगडे, स्वप्नील पाटील, हेमंत चामट यांना नामांतरण संबंधीत अर्ज वेळेवर निकाली न काढल्यामुळे थेट निलंबीत करण्यात आले. अशोक गिरी, राजस्व निरीक्षक, अमित दामणकर कर संग्राहक हे दोन्हीही कर्मचारी बिनापरवानगीने गैरहजर होते म्हणून या दोघांनाही निलंबीत करण्यात आले.
तसेच कर विभागाकडून होत असलेल्या कामचुकारपणाबद्दल नेहरुनगर झोनच्या कर विभागाच्या सहायक अधीक्षक अनिल महाजन यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
मालमत्तेचे नामांतरण, कर निर्धारण संदर्भातले प्रलंबित कामे ४८ तासाच्या आत करण्याचेही आदेश त्यांनी दिले. झोन अंतर्गत आयुक्तांनी २१ हजार नागरिकांकडून १५.९२ कोटीचे मालमत्ता कर वसुल करण्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश दिले.