नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारासाठी सात खासदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून, या सात खासदारांमध्ये पाच खासदार महाराष्ट्राचे आहेत हे विशेष. या सर्व खासदारांना चेन्नईत होणाऱ्या एका कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील ज्या पाच खासदारांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आणि भाजपाच्या हिना गावित यांचा समावेश आहे. खासदारांची हजेरी, चर्चेमधील सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयकं यांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी एकूण ७४ चर्चांमध्ये सहभाग घेतला असून १६ खासगी विधेयकं सादर केली आहेत. तसंच त्यांनी ९८३ प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची उपस्थिती एकूण ९८ टक्के आहे. याशिवाय श्रीरंग बारणे यांनी १०२ चर्चांमध्ये सहभाग घेतला, तर १६ खासगी विधेयकं सादर केली. त्यांनी ९३२ प्रश्न उपस्थित केले. त्यांची एकूण हजेरी ९४ टक्के आहे.
राजीव सातव यांनी ९७ चर्चांमध्ये सहभाग घेतला असून १५ खासगी विधेयकं सादर केली आहे. त्यांनी एकूण ९१९ प्रश्न उपस्थित केले. त्यांची एकूण हजेरी ८१ टक्के आहे. धनंजय महाडिक यांनी ४० चर्चांमध्ये सहभाग घेतला असून एक खासगी विधेयक सादर केले. त्यांनी एकूण ९७० प्रश्न उपस्थित केले. तसंच ७४ टक्के हजेरी आहे. हिना गावित यांनी १५१ चर्चांमध्ये सहभाग घेतला असून २१ खासगी विधेयकं सादर केली आहेत. त्यांनी ४६१ प्रश्न उपस्थि केले आणि ८२ टक्के हजेरी आहे.