Published On : Mon, Jul 3rd, 2023

नागपूरजवळील मोहगाव झिल्पी तलावात पाच तरुणांचा बुडून मृत्यू !

पोहण्याचा मोह आला अंगलट
Advertisement

नागपूर : हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावात पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चार तरुणांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. चौघांनाही पोहणे येत नसल्यामुळे ते बुडायला लागले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पाचव्या तरुणांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. ऋषिकेश पराळे (२१,वाठोडा,), राहुल मेश्राम (२३, गीडोबा मंदिर चौक, वाठोडा), वैभव भागेश्वर वैद्य (२४, भांडेवाडी रोड, पारडी) शंतनू ( वय २३) अशी मृताची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाठोडा परिसरात राहणारे आठ जण रविवारी दुपारी पिकनिक करण्यासाठी मोहगाव झिल्पी तलाव परिसरात आले होते. हे तरुण दुचाकीवरून मोहगाव झिल्पी येथे पिकनिकसाठी आले होते. सुरुवातीला काही काळ सर्व जण तलाव परिसरात फिरले आणि मोबाइलवर फोटोही काढले.

Advertisement

संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास आठ पैकी एक तरुण तलावात उतरला. तो बुडायला लागला. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याला वाचाविण्यासाठी अन्य चार जणांनी तलावात उडी घेतली. दुर्दैवाने पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अनुराग जैन, हिंगणा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.