Mumbai: महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक राज्यात झाली पाहिजे यासाठी सरकारने प्रयत्न केले. या प्रयत्नाला यश आले आणि संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला.
संघटीत क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात तयार झाला. औद्योगिक क्षेत्रात राज्याची आगेकूच सुरू आहे. पण हे करत असताना समाजात सोहार्द राहावा यासाठी सरकारने प्रयत्न केला, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहणावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर एससी-एसटी, ओबीसी योजनांसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या.
समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत शहरी असो किंवा ग्रामीण राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र सातत्याने पुढे जावा. त्यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहणे आवश्यक आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला पाहिजे. सर्वांना एकत्रित घेऊन बलशाली महाराष्ट्र करू, असे म्हणत आजपर्यंत महाराष्ट्र एकसंध राहिला तो पुढेही ठेऊ, असे फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारने विक्रमी पद्धतीने अन्नधान्याची खरेदी केली आहे. १९९८ ते २०१४ या १५ वर्षांच्या कालावधीत फक्त ४५० कोटी रूपयांची खरेदी करण्यात आली होती. पण मागील ३ वर्षांत राज्य सरकारने ८ हजार कोटींची खरेदी केल्याचे सांगत त्यांनी मागील आघाडी सरकारवर अप्रत्यक्ष टीकाही केली. शेतकऱ्यांच्या प्रती राज्य सरकार प्रतिबद्ध असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून राज्य सरकार सातत्याने प्रयत्नरत आहे. जागतिक बँकेबरोबरही प्रकल्प सुरू केले आहेत. विशेषत: विदर्भ, मराठवाडामध्ये लक्ष देण्यात आले आहे.
Flag hoisting ceremony at Mantralaya, Mumbai… #HappyIndependenceDay ! https://t.co/h7rKZ44vpi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 15, 2018