नागपूर: नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.अनेकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. हे पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ठिकठिकाणी मतदारसंघात गेले. यादरम्यान फडणवीस यांना जनतेच्या रोषाला समोर जावे लागले.
प्रशासकीय अधिकारी, भाजपचे आजी-माजी नगरसेवक आणि पक्षाच्या नेत्यांसह फडणवीस पूरग्रस्त अंबाझरी लेआउट आणि कॉर्पोरेशन कॉलनीत राहणाऱ्या जनतेच्या समस्या जाणून घ्यायला गेले होते. मात्र यादरम्यान जनेतेने आपली नाराजगी बोलून दाखवली.
भावनाविवश झालेल्या महिलांच्या एका गटाने फडणवीस यांच्या वाहनासमोर उभे राहून त्यांचे म्हणणे ऐकण्याची मागणी केल्याचे पाहायला मिळाले.
नागनदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्याची नासाडी झाली.नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला.यावेळी माजी महापौर संदीप जोशी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.