नागपूर,: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्यान शाखेमार्फत विधानभवन परिसरात 50 व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनास आजपासून सुरुवात झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांच्या हस्ते या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार आणि उपवने व उद्याने विभागाचे सहायक संचालक प्रसाद कडूलकर आदी यावेळी उपस्थित होते.
या पुष्प प्रदर्शनात 45 स्पर्धकांच्या एकूण सहा विभागामधील विविध उप विभागांतर्गत 800 प्रवेशिका दाखल झाल्या आहेत. स्पर्धकांमध्ये राजभवन, महामेट्रो, एनएडीपी, सीपीडब्ल्यूडी आदींसह वैयक्तिक स्पर्धकांचा समावेश आहे. येथे गुलाब, हंगामी फुलझाडे, शोभिवंत झाडाच्या कुंड्या, फुलांच्या कुंड्या, विविध प्रकारचे निवडुंग, लँडस्केप ऑन द स्पॉट, बगीच्या प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
येथे औषधी वनस्पतींचे खास दालनही उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन आजपासून सर्व नागरिकांसाठी 26 जानेवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत नि:शुल्क खुले राहणार आहे.