केंद्र सरकारच्या निर्णयालाही बगल ः निकृष्ट दर्जाच्या कामाची चर्चा
नागपूर, ता. ८ ः सध्या रिंग रोड टप्पा एकचे काम सुरू असून यात निकृष्ट दर्जाची दहा वर्षे जुन्या राखेचा वापर होत आहे. एनटीपीसी मौदा प्रकल्पातून राख घेण्याऐवजी बंद पडलेल्या अभिजित ग्रुपच्या मिहानजवळील प्रकल्पाची जुनी राख वापरण्यात येत असल्याने रिंग रोड, उड्डाणपूलाचे कामही निकृष्ट दर्जाचे होण्याची शक्यता आहे. यात मोठा भ्रष्टाचाराचे संकेत मिळत आहे.
केंद्र सरकारने रिंग रोड, उड्डाणपूलाच्या कामासाठी उर्जा प्रकल्पाची राख वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात या निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. परंतु कंत्राटदार कंपनीच्या कामाकडे अधिकारीही दुर्लक्ष करीत आहे. मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पातून राख वापरण्यासाठी यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे या प्रकल्पाची राख रस्ता, उड्डाणपूलाच्या कामात वापर करणे अपेक्षित आहे. परंतु या कामात बंद पडलेल्या अभिजित ग्रुपच्या मिहानमधील प्रकल्पाची राख वापरण्यात येत आहे. ही राख दहा वर्षे जुनी असून त्याची माती झाली असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
राखेची स्ट्रेन्थ क्षमता १० पेक्षा जास्त असली तरच रस्त्याचे काम योग्य होऊ शकते. परंतु कंत्राटदार कंपनीकडून वापरण्यात येणाऱ्या राखेची माती झाली असून स्ट्रेन्थ क्षमता ६ ते ७ आहे. पूर्णपणे माती झालेल्या राखेचा वापर होत असल्याने रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत या रस्त्यावर १००० ते १३०० ट्रक राख टाकण्यात आले आहे. कंत्राटदार कंपनीने निकृष्ट राखेचा वापर थांबविण्याची मागणी तज्ज्ञांनी केली आहे. या कामात मोठा भ्रष्टाचाराचेही आरोप होत आहे.