नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजही विरोधकांनी सरकारला घेरले. राज्य सरकार ड्रग्ज माफियांसमोर लोटांगण घालत असल्याचा घणाघात विरोधकांनी सोमवारी केला. ‘उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र’, ‘सरकारकडून काय करावी आशा, तरुणांच्या माथी मारली ड्रग्जची नशा’, असे फलक हातात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याबाबत भाष्य करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गुजरातमधून दोन हेलिकॉप्टर येतात. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात ड्रग्स माफिया कार्यरत आहेत. त्यांना सरकार पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री या माफियांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान विरोधकांच्या आंदोलनात परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह वर्षा गायकवाड पाटील, रवींद्र धंगेकर, सतेज पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होते.