महापौर संदीप जोशी यांची नागरिकांना कळकळीची विनंती
नागपूर : नागपुरात ‘कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. पुढील १५ दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘लॉकडाऊन’ हा कोणाचे नुकसान व्हावे, या हेतूने जाहीर करण्यात आला नाही तर आपल्या आणि कुटुंबीयांच्या भविष्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत. त्यामुळे कृपया लॉकडाऊन पाळा. घरीच कुटुंबीयांसोबत वेळ घालवा आणि त्यांनाही सुरक्षित ठेवा, अशी कळकळीची विनंती महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना केली आहे.
नागपुरात अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत. मात्र, त्याचा गैरफायदा घेताना नागरिक दिसत आहेत. दुकानात गेल्यानंतर तेथे नियम पाळल्या जात नाही. कॉटन मार्केटमध्ये विनाकारण गर्दी केली जात आहे. त्यामुळे आता मोजक्या लोकांमध्ये असलेला कोरोना विषाणू समाजात पसरण्यास वेळ लागणार नाही. केवळ काळजी हाच यावरील उपाय आहे. जर हा वेगाने पसरला तर १५ एप्रिलनंतरही घरात बसण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. आता जर या विषाणूवर विजय मिळविला तर लवकर आपल्याला घराबाहेर पडून आपली दैनंदिनी सुरू करता येईल. त्यामुळे सर्वांनी घरातच राहावे. घरपोच सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हे करीत असताना ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना संपूर्ण मदत देण्याचा शासन आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, महापौर संदीश जोशी यांनी शहरातील विविध परिसरात जाऊन नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहनही केले. प्रशासकीय यंत्रणेचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून नागरिकांनी कुठलीही आरोग्य सेवा हवी असल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.