Published On : Tue, Apr 28th, 2020

भुकेल्यांना अन्न, हीच खरी ईश्वरसेवा महापौर संदीप जोशी : ‘कम्यूनिटी किचन’ला भेट

नागपूर : लॉकडाउनमध्ये शहरात अनेक नागरिक, विद्यार्थी अडकलेले आहेत. तर रस्त्यावर राहून जीवन व्यतित करणारे किंवा रोजगारासाठी शहरात धाव घेणा-यांचीही वाताहत होत आहे. यासर्वांच्या सुविधेसाठी मनपाच्या सेवा कार्याला अनेक संस्थांनी साथ देउन मनपाचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात कुणीही उपाशी राहू नये यासाठी सर्वच अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे भुकेल्यांना अन्न, हीच ईश्वरसेवा आहे, अशी भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या नागरिकांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्यासाठी शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था मनपाला सहकार्य करीत आहेत. आतापर्यंत ४४ स्वयंसेवी संस्थांनी या सेवा कार्याला मनपाला साथ दिली आहे. या संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करण्यासाठी मंगळवारी (ता.२८) महापौर संदीप जोशी यांनी पूर्व नागपुरातील स्वयंसेवी संस्थांच्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट दिली.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पूर्व नागपुरातील पूर्वा ऑटोमोबाईल मित्र परिवार, इस्कॉनचे अन्नमित्र फाउंडेशन आणि शगुन महिला मंडळ या तीन संस्थांमार्फत दररोज १५ हजार ‘फूड पॅकेट्स’चे वितरण करण्यात येत आहे. या तिन्ही संस्थांच्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट देउन महापौर संदीप जोशी यांनी सेवा कार्यासाठी अहोरात्र झटणा-या प्रत्येकाचे अभिनंदन केले. यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम उपस्थित होते.

कोरोनाला मात देण्यासाठी आज प्रत्येकच जण घरात राहून प्रशासनाला सहकार्य करीत आहे. मात्र ज्यांना घरच नाही किंवा घर आहे पण आसराच नाही अशांची होणारी वाताहत लक्षात घेता मनपाने घेतलेला पुढाकार हा स्तूत्य आहे. मात्र मनपाच्या या कार्याला शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारा प्रतिसाद हा कौतुकास पात्र आहे. आपल्या शहरातील कोणतिही व्यक्ती अन्नाविना राहू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

ज्यांना अन्नाची गरज आहे त्या प्रत्येकाने मनपाच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा. नागरिकांच्या सोयीसाठी मनपाने हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ तर दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांनी ०७१२-२५६७०१९ या क्रमांकावर मनपाशी संपर्क साधून आवश्यक मदत मिळवून घ्यावी. शहरातील हे सेवा कार्य पुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी फक्त घराबाहेर निघू नये, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Advertisement