नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरातील जागेमध्ये आठ हजार रोपांची लागवड करून येथे वन आच्छादन करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड कार्याचा शनिवारी (ता.३०) विद्यापीठाचे कुलगुरू श्री. सुभाष चौधरी व मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्री. संजय दुधे, कुलसचिव श्री. राजू हिवसे, मनपाचे उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत विभागाचे संचालक डॉ. विजय खंडार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. माहेश्वरी, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, डॉ. दत्तात्रय वाटमोडे, मानवविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
नागपूर शहरातील वायू गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडून १५व्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला २ कोटी १४ लक्ष रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीमधून विद्यापीठाच्या १५ एकर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू श्री. सुभाष चौधरी व मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्री. संजय दुधे, कुलसचिव श्री. राजू हिवसे यांनी कुदळ मारून वृक्ष लागवड कार्याचा शुभारंभ केला. याशिवाय त्यांनी संयुक्तरित्या वृक्ष लागवडही केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी संपूर्ण जागेची पाहणी. या ठिकाणी वृक्ष लागवड, झाडांना पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
वृक्ष लागवडीसाठी विद्यापीठाने मनपाला १५ एकर जागा उपलब्ध करून दिली असून या जागेत सावलीची आणि फळझाडे अशी विविध प्रजातींची ८ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. ओसाड जमिनीवर वृक्ष लागवडीद्वारे वन आच्छादन करून येथे पशू-पक्षी तसेच इतर किटकांसाठी अधिवास निर्माण होणार आहे. याशिवाय शहरातील नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी थंड जागा उपलब्ध होईल. विद्यापीठाच्या १५ एकर मोकळ्या जागेमध्ये संपूर्ण शहराकरिता ‘ब्लॉक प्लँटेशन’ अर्थात ‘अर्बन फॉरेस्ट’ प्रकल्प राबविण्यात येणर आहे. मनपाद्वारे वृक्ष लागवडीसाठी मे. तेजस सुपरस्ट्रक्चर प्रा. लि. उस्मानाबाद या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंत्राटदाराला लागलेल्या झाडांची ३ वर्षांकरिता देखभाल करायची आहे.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. धर्मेश धवनकर यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले.