मुंबई : राज्यातील मोठ्या स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या आसपासची गावे दत्तक घेऊन तेथील लोकसंख्येएवढी झाडे लावावीत, ते संपूर्ण गाव हिरवेगार करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृहात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वन विभागाचे सचिव विकास खारगे, वरिष्ठ वन अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये ग्रीन थम, पुणे, रिव्हर मार्च, ग्रीन यात्रा, स्वप्नं याना फाऊंडेशन, अम्मा केअर फाऊंडेशन, हरियाली, संस्कृती फाऊंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वन, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन आणि पर्यावरण रक्षणात दुसरी व्यक्ती काय काम करते यावर भाष्य करण्यापेक्षा आपण यात कशा प्रकारे योगदान देऊ शकतो याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज असल्याचे वनमंत्री म्हणाले. ‘सूरज ना बन पाये तो बनके दीपक जलता चल’ ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. पर्यावरण रक्षणात वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपात लोक सहभागी होऊ शकतात. यासाठी विविध प्रकारचे व्यासपीठ शासनाने उपलब्ध करून दिले आहे. ग्रीन आर्मी, हॅलो फॉरेस्ट 1926, महा फॉरेस्ट फेसबुक पेज, यू ट्यूब चॅनल, इन्स्टाग्राम यासारख्या विविध समाज माध्यमांमध्ये वन विभाग सक्रिय असून या माध्यमांद्वारेही सर्वांना वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेले काम शासनाकडे नोंदवता येईल. वृक्ष लागवडीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणता वृक्ष कुठे लावला हे ट्रॅक करणे शक्य झाले आहे. ही सर्व माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून सर्व जनतेसाठी खुली आहे.
स्वयंसेवी संस्था वन विभागाशी त्रिपक्षीय करार करून वनसंवर्धनाच्या कामात सहकार्य करत आहेत. आणखी ज्या संस्थांना यात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी राज्यभरात वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती पुस्तिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ती पब्लिक डोमेनवरही उपलब्ध करून दिली जाईल. ‘मेरा नाम पेड काटनेवाले हाथो मे नही तो पेड लगानेवाले हाथोंमे आना चाहिए, आग लगाने वाले नही तो आग बुझानेवाले हाथोंमे आना चाहिए’ असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, असे झाल्यास पर्यावरण रक्षणाचा हा गोवर्धन उचलणे शक्य होईल, एक सुंदर पृथ्वी आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकू असेही ते म्हणाले.
माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेकार्थाने वृक्ष माणसांची सोबत करतात, त्याचे पोषण करतात, त्या वृक्षसंपदेचे अस्तित्व असलेली वने जपणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. स्वयंसेवी संस्था त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू शकतात.
वन सचिव विकास खारगे यांनी मागील दोन वर्षांचा वृक्ष लागवडीचा अनुभव सांगताना त्यातील स्वयंसेवी संस्थांचे महत्व अधोरेखित केले तसेच हरित महाराष्ट्र मिशन मध्ये ग्रीन आर्मीच्या माध्यमातून सहभागी व्हावे असे देखील म्हटले. कार्यक्रमस्थळी ग्रीन आर्मीचे सदस्य होण्यासाठी स्टॉल उभे करण्यात आले होते. बैठकीस उपस्थित स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी वृक्ष लागवडीत मागील दोन वर्षात त्यांनी घेतलेला सहभाग आणि भविष्यातील नियोजन याची माहिती दिली तसेच मोहीम अधिक यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत आपली मतं व्यक्त केली.
बैठकीत वन विभागातर्फे ग्रीन आर्मी आणि वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीस आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे विभागाने कोरफड, तुळशीचे रोप देऊन स्वागत केले.