नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या 1.59 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी नागपूर शहर अध्यक्ष शेख हुसेन यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
माहितीनुसार, ट्रस्टचे माजी अध्यक्ष हुसेन यांनी 1.48 कोटी रुपयांचा घोळ केल्याची माहिती आहे. तर माजी सचिव इक्बाल बेल्जी यांनी 11 लाख रुपये त्यांच्या वैयक्तिक खात्यात वळवले, असे ऑडिट अहवालात उघड झाले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रविवारी दोघांनी मॅजिस्ट्रेटसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर हुसेन व्यतिरिक्त बेल्जीलाही अटक करण्यात आली. ते 2011 ते 2016 दरम्यान ट्रस्टचे सचिव होते. हुसेन आणि बेल्जी यांनी ट्रस्टच्या खात्यांचे ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष केले होते.सप्टेंबर 2022 मध्ये सक्करदरा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. ईओडब्ल्यूने हुसेन आणि बेल्जी यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवली आहे.