नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी. व्ही. नरसिंहराव आणि भारतीय हरितक्रांतीचे जनक कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने याअगोदर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भारतीय हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन-
कृषी क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल हरित क्रांतीचे जनक एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात येत आहे. याचा अत्यंत आनंद असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. दरम्यान डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्याबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग माजी पंतप्रधान नरसिंह राव (Narsimha Rao) यांना देखील भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढवणारे पी. व्ही. नरसिंहराव-
भारत एका मोठ्या अर्थक्रांतीच्या आणि धोरण क्रांतीच्या उंबरठ्यावर होता. ही धोरणबदलांची क्रांती घडवण्यात तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता. डॉ. मनमोहन सिंग या राजकारणाबाहेरच्या व्यक्तिमत्वाला अर्थमंत्रिपदी नेमणं नंतर भारतानं वेगानं आर्थिक धोरणबदलांची वेगानं पावलं टाकणं याचा इतिहास मोठा रोचक आहे. 1991च्या वर्षभरात एखाद्या पॉलिटिकल थ्रिलर सिनेमात घटना घडाव्यात तशा घटना घडत गेल्या. डॉ. सिंग या घटनांचे साक्षीदार होते.
शेतकऱ्यांचा मसिहा म्हणून ओळखले जाणारे चौधरी चरणसिंग –
शेतकरी कुटुंबातून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास करणारे माजी पंतप्रधान दिवंगत चरणसिंग चौधरी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चौधरी चरणसिंग हे देशाचे पाचवे पंतप्रधान होते. राजकारणाच्या सुरुवातीपासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत ते शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलके राहिले. शेतकरी नेता म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. चौधरी चरणसिंग हे असे नेते होते ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावरून संसदेपर्यंत मांडले. शेतकऱ्यांचा मुलगा असण्यापासून त्यांना शेतकऱ्यांचा मसिहा म्हटले जाते.