महामार्गांच्या जाळ्यामुळे मप्रच्या
विकासाचे चित्र बदलणार : ना गडकरी
-1361 किमी लांब 45 महामार्ग परियोजना
-नवीन महामार्गांसाठी 10 हजार कोटींची घोषणा
नागपूर: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आज मध्यप्रदेशात 11427 कोटी रुपये खर्चाच्या 1361 किमी लांबीच्या 45 महामार्ग परियोजनांचा शीलान्यास आणि लोकार्पण भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. मध्यप्रदेशात निर्माण होणार्या या महामार्गांच्या जाळ्यामुळे मध्यप्रदेशाच्या विकासाचे चित्र बदलणार असल्याचे मत ना. नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. मप्रतील नवीन महामार्गांच्या कामासाठी आज 10 हजार कोटींची घोषणाही ना. गडकरी यांनी केली.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, ना. थावरचंद गहलोद, ना. नरेंद्रसिंग तोमर, ना. गोपाल भार्गव, ना. प्रल्हाद पटेल, ना. फग्गनसिंग कुलस्ते, ना. व्ही. के. सिंग, खासदार आणि आमदार ऑनलाईन उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, या महामार्गांमध्ये अनेक महामार्ग असे आहेत की, ज्यामुळे पर्यटनाला अधिक वाव मिळेल. तसेच मागास भागाला जोडण्याचे काम या महामार्गांमुळे झाले आहे. 2609 कोटीच्या खर्चातून 369 किमी रस्ते निर्माणाचे 19 कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. तसेच 8818 कोटीच्या 992 किमी लांबीच्या 26 रस्ते निर्माण कार्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
आज शिलान्यास झालेल्या महामार्गांमध्ये ननासा ते बैतूल 117 किमी 4 पदरी मार्ग, 2420 कोटी, हा 270 किमी लांब मार्ग इंदोर, हरदा बैतूल, आर्थिक कॉरिडोरचा हिस्सा आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर इंदोर ते नागपूर सरळ जोडले जाणार आहे. कटनी बायपास चार पदरी मार्ग- 195 कोटी खर्च करून 20 किमीचा चार पदरी बायपास बनवला जात आहे. ओरछा पूल निर्माण कार्य 25 कोटी खर्च येणार असून मार्च 2022 पर्यंत हा पूल पूर्ण होईल. क्षिप्रा नदी पूल- इंदोर बैतुल मार्गावर क्षिप्रा नदीवर पूल नसल्यामुळे अनेक अडचणीं निर्माण होत आहेत. 10 कोटी रुपयांचा दोन पदरी पूलाचे निर्माण काम करण्यात येणार असून सप्टेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण होईल.
जबलपूर डिंडोरी मार्गावर 26 कोटीचा दोन पदरी दोन लेन पुलाचे निर्माण करण्यात येईल. वनवासी क्षेत्राला हा रस्ता पुलामार्फत जोडला जाणार आहे.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 85 कोटीचे 59 किमी लांबीचे 4 कामे करण्यात येणार आहे. तसेच 700 कोटी रुपये पुन्हा ना. गडकरी यांनी मध्यप्रदेशसाठी देण्याचे आश्वासन दिले असून यापैकी 350 कोटी खासदार आणि 350 कोटी रुपये आमदारांनी सुचविलेल्या कामासाठी देण्यात येतील.
आजच्या कार्यक्रमात ग्वालियर ते देवास, रिवा जलबपूर लखनादौन मार्ग, भोपाल सांची सागर, छतरपूर, भोपाळमध्ये लालघाटी ते मुबारकपूर मार्ग या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. महामार्गांच्या नवीन कामांसाठी 10 हजार कोटींची घोषणा ना. नितीन गडकरी यांनी आज या कार्यक्रमादरम्यान केली.
मध्यप्रदेशात राष्ट्री महामार्गांची 2014 मध्ये 5186 किमी लांबी होती, ती आ 13248 किमी झाल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले. तसेच 1 लाख 25 हजार कोटींची महामार्गांची कामे सुरु आहेत. 30 हजार कोटींच्या रस्ते निर्माण कार्यक्रमात 70 टक्क्याहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. सन 2023 पर्यंत 50 हजार कोटींची रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
सन 2021 मध्ये 17 महामार्गांची कामे पूर्ण हेात असून यात काही उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश आहे. तसेच 2020-21 मध्ये अपूर्ण असलेल्या महामार्गाची कामेही पूर्ण केली जातील. इंदोर व जबलपूर येथे बीओटीवर लॉजिस्टिक पार्क बनविण्यात येईल. मध्यप्रदेशातील राष्ट्रीय महामार्गांवर 241 अपघातग्रस्त स्थळे शोधण्यात आली असून 157 अपघातस्थळांवर दुर्घटना नियंत्रणाचे काम करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.