नागपूर: , वाठोडा पोलिस आणि नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रॉपर्टी डीलर जितेंद्र विठ्ठलराव चिकटे यांच्या घरावर झालेल्या दरोड्यानंतर अवघ्या चार तासांत चार दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळवले. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र चिकटे हे एकटेच घरात असताना पाच दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. मागचा दरवाजा तुटल्याच्या आवाजाने घाबरून गेलेल्या चिकटे यांना मास्क घातलेल्या चार व्यक्तींसमोर दिसले. हल्लेखोरांनी चिकटे यांच्या मानेवर चाकूने वार केला त्यानंतर, त्यांनी त्यांचे हात कापडाने बांधले. यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर खंजीराने वार केले. घुसखोरांनी बेडरूमची तोडफोड केली, कपाटातील साहित्य चोरले. ज्यात मंगळसूत्र आणि चांदीच्या भांड्याचा समावेश होता. त्यानंतर आरोपींनी समोरच्या दरवाजाने घटनास्थळावरून पळ काढला.
स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर जितेंद्रने तातडीने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली आणि वाठोडा पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासासाठी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक (पीआय) गोकुळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली क्राइम ब्रँचच्या युनिट 4 ने तडकफडकी कारवाई करत, गुन्हेगार हे हिंगणा रस्त्यावरील राजीव नगर भागात राहणारे ऑटो-रिक्षाचालक असल्याची माहिती मिळाली.
या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलीस पथकाने या गुन्ह्यातील चार जणांना तत्काळ अटक केली. चिकन उर्फ नौशाद मुस्तफा खान (वय 21, रा. हिंगणा रोड) , मोहम्मद इर्शाद रईस अन्सारी (३०) , नासीर शौकत शेख (24) आणि नितेश रामलोचन यादव (19, सर्व रा. राजीव नगर, हिंगणा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आरोपींना गणेश दांडेकर नावाच्या गुंडाकडून जितेंद्रच्या घराविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सापळा आखून दरोडा टाकला.