नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळतच चालला आहे. यापार्श्वभूमीवर सर्व बाबींचा विचार करत राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार दिवसभर चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. परंतु, या बैठकीला मनोज जरांगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.
आजच्या बैठकीला राज्यमंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आज उपसमितीचीही बैठक आहे. राज्य मागासवर्गीयाचीही बैठक आहे. याबाबत अधिकृत पत्रकात उल्लेख नाही, परंतु सरकारकडून तसं सांगण्यात आलंय. मराठा आरक्षणासंदर्भात आज चार मॅरेथॉन बैठका होणार आहेत. जनरल सॉलिसिटरपासून सचिव, महारष्ट्रातील सर्व सचिव, मंत्री यात असणार आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात आज पूर्णदिवस बैठक आहे. माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी बैठकीला जाऊ शकत नाही. मी बैठकीला यावे असा त्यांचा आग्रह होता. पण मी बैठकीत जाऊन काय करणार? त्यांनी खूपवेळा फोन करून विनंती केली. मुख्यमंत्र्य्यांनी बैठकीला येण्याचं आमंत्रण दिलंय. परंतु, आम्ही म्हणणे मांडले आहे. बच्चू कडू, उदय सामंत, गिरीश महाजन यांच्याकडे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे बैठकीला जाऊन मी काय करणार? असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने ओपन चर्चा केली पाहिजे, या मतावर मी होतो. मी तिथे जाऊन लाईव्ह झालच नसतं. त्यामुळे सरकारने व्हीसीद्वारे चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे. आंतरवालीत व्हिसीद्वारे चर्चा होणार आहे. या चर्चेतून सरकारची भूमिका लक्षात येईल. मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून २० तारखेला मुंबईला मराठे जाणार म्हणजे जाणार, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.