मुंबई: नुकत्याच झालेल्या इयत्ता १२ वी च्या बोर्ड परीक्षेमधील विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र या पेपरमध्ये ४ प्रश्न चुकीचे आले होते. त्याचे ७ गुण सरसकट देण्याविषयीचे निवेदन विधीमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना देण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत चर्चा करीत असताना संघटनेच्या पदाधिका-यांनी बोर्डाच्या अध्यक्षांनी ज्या विद्यार्थ्यांनी हे चुकीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनाच ७ गुण दिले जातील हा निर्णय चुकीचा आहे व याला सर्वस्वी बोर्ड जबाबदार असून याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना न बसवता करीअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या वर्षामध्ये सरसकट ७ गुण देवून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे आणि येथून पुढच्या कालावधीत होणाऱ्या परीक्षांमध्ये सदरच्या चुका टाळाव्यात अशी चर्चा यावेळी झाली.
या प्रश्नावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बोर्डाकडून याचा अहवाल मागवून सरसकट ७ गुण दिले जातील असे आश्वासन दिले.
यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष विशाल सुर्यवंशी , उपाध्यक्ष राहुल डांगे, सरचिटणीस लखन पवार , इस्लामपूर शहर उपाध्यक्ष अवधुत सुर्यवंशी उपस्थित होते.