नागपूर: ‘आपल्या देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात व 1.5 लक्ष लोक मुत्युमुखी पडतात. ब-याच अंशी हे अपघात सदोष रस्ते अभियांत्रिकी, वाहन – चालकांच्या चूका तसेच दृष्टीदोष यामुळे घडतात. राष्ट्रीय महामार्गाचा सर्वांत जास्त वापर करणारे ट्रक चालकांच्या दृष्टीदोषाचे निदान करून, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी एक सामाजिक दायित्व म्हणून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एन.एच.ए.आय.) आयोजित ट्रक चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर हा एक स्तुत्य उपक्रम आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूरातील राष्ट्रीय महामार्ग सातच्या बायपास विभागातील पांजरी टोल प्लाझा येथे ट्रक-चालक, मदतणीस (क्लिनर) यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण शिबीराचा शुभारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सदस्य डी.ओ. तावडे, एन.एच.आय.चे मुख्य महाव्यवस्थापक अतुल कुमार तसेच हिंगण्याचे आमदार समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशभरात 50 ठिकाणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधीन असणा-या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एन.एच.ए.आय.) 2 ते 6 ऑक्टोबर 2017 दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 21 राज्यांचा समावेश आहे. देशात 22 लक्ष वाहन चालकांची आवश्यकता असून, येत्या 2 वर्षात चालकांच्या प्रशिक्षणासाठी देशभरात दोन हजार ड्रायव्हिंग स्कुल उघण्यात येणार असून त्यामुळे चालकांना प्रशिक्षण देणे व आर.टी.ओ. कार्यालयातून वाहन परवाना देणे असे उपक्रम सुरू होणार असून याच सेंटरला फीटनेस सेंटर व पोल्युशन चेक सेंटर म्हणूनही मान्यता मिळणार आहे. ट्रक चालकांना त्यांच्या कामामध्ये सुसह्य वाटावे याकरीता ट्रकच्या कॅबीन संरचनेमध्ये ‘एअर सर्क्यूलेटींग फॅनची’ सुविधा निर्माण करुन चालकांना तणावमुक्त वातावरण उपलब्ध करुन देण्याकरीता आपण निर्देश दिले असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
देशभरात सातशे रोडशेड अॅम्नेटिजच्या कार्याअंतर्गत सुरू होणा-या ‘ड्रायव्हरक्लबच्या’ माध्यमातून ट्रक चालकांना राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था उपलब्ध होणार आहे. तसेच रोड अम्नेटिज अंतर्गत प्रवाश्यांसाठी गार्डन, मॉल, विश्रांतीगृह यांचीही सुचिधा उपलब्ध होईल. अशा प्रकारच्या सत्तर सेंटरच्या निवीदा प्रक्रियाही सुरू झाल्या आहेत. यावर्षी रस्ते अपघातामध्ये 5 टक्के घट झाली असून पाच वर्ष संपताअखेर आपण रस्ते अपघातातून 50 हजार व्यक्तींचे प्राण वाचवू शकू, असे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारचे नेत्र तपासणी शिबीर महाराष्ट्रातील नागपूर व मुंबई येथे सुरु झाले असून नागपूरात पांजरी टोल प्लाझा, माथनी टोल प्लाझा व सेंदुरवफा टोल प्लाझा येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पांजरी टोल प्लाझा येथे 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान तर माथनी टोल प्लाझा येथे 4 ते 5 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 9 ते 6 या वेळेत ट्रक चालकांना या शिबीराचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पदाधिकारी, ट्रक चालक व नागरिक उपस्थित होते.