नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय हँडबॉल स्पर्धेचे फ्रेन्ड्स क्लब संघाने दुहेरी विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे ही स्पर्धा पार पडली. फ्रेन्ड्स क्लब संघाने महिला आणि १७ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रतिस्पर्धीं संघांना मात देउन विजेतेपद प्राप्त केले.
पुरुष खुल्यागटात अमरावती विरुद्ध अजिंक्य क्लब यांच्यात अंतिम लढत झाली. चुरशीच्या सामन्यात अमरावती संघाने बाजी मारली. अजिंक्य क्लबला २३-२० ने नमवून अमरावती संघाने विजेतेपद प्राप्त केले. महिला गटात धामणगाव संघाचा फ्रेन्ड्स क्लब कडून पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम लढतीत फ्रेन्ड्स ने धामणगाव चा २५-१५ ने पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
१७ वर्षाखालील वयोगटात क्रीडा प्रबोधिनीने अजिंक्य क्लब कोंढाळी संघाचा पराभव करुन जेतेपदावर नाव कोरले. क्रीडा प्रबोधिनीने अजिंक्य क्लबचा २२-२१ ने पराभव करुन बाजी मारली. मुलींच्या सामन्यात फ्रेन्ड्स क्लबने खेलो इंडिया संघाचा १८-१५ ने पराभव करुन अजिंक्यपद मिळविले.
विजेत्यांना प्रा. विजय बारसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी हँडबॉल संघटनेचे रुपकुमार नायडू, आत्माराम पांडे, सुनील भोतमांगे, सतीश वडे, चंद्रशेखर दुबे, इंद्रजीत रंधावा, चारुशिला शेट्टीवार, पंकज कोठारी उपस्थित होते.