नागपूर: नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण समिती, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका केंद्राच्या वतीने विदर्भातील महिला बचत गटांच्या उत्पादनांची प्रदर्शनी व विक्री अंतर्भूत असलेला महिला उद्योजिका मेळावा रविवार (ता. ४) पासून सुरू होत आहे. रेशीमबाग मैदानावर आयोजित या मेळाव्यात सुमारे ३०० स्टॉल्स राहणार असून दररोज सायंकाळी प्रख्यात कलावंतांचा समावेश असलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
पत्रपरिषदेला स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत उपस्थित होते.
मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना सभापती वर्षा ठाकरे पुढे म्हणाल्या, मेळाव्याचे उद्घाटन ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रूपा गांगुली उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. खासदार अजय संचेती, खासदार डॉ. विकास महात्मे, आ. नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रा. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयुक्त अश्विन मुदगल, जि.प.च्या सीईओ कादंबरी बलकवडे, वर्धेच्या सीईओ नयना गुंडे, बसपा पक्षनेता शेख मोहम्मद जमाल, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेविका उषा पॅलट, नगरसेवक सतीश होले, डॉ. रवींद्र भोयर, शीतल कामडी, अपर आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांची उपस्थिती राहील.
समारोप ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. दररोज सायंकाळी ६.३० वाजता सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर महाराष्ट्रीयन लोककलेवर आधारीत कार्यक्रम राहील. ५ फेब्रुवारीला राजेश चिटणवीस प्रस्तुत घटकाभर बसा आणि पोटभर हसा, ६ फेब्रुवारी रोजी जागर स्त्रीशक्तीचा, ७ फेब्रुवारी रोजी प्रसन्न जोशी प्रस्तुत भजनसंध्या आणि गजल, ८ फेब्रुवारी रोजी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी प्रस्तुत ‘आयुष्यावर बोलू काही’, ९ फेब्रुवारी रोजी उमंग, १० फेब्रुवारी रोजी भरत जाधव, गिरीश ओक, शिवाणी रांगोळे प्रस्तुत ‘वेलकम जिंदगी’ आणि समारोपीय कार्यक्रमानंतर ११ फेब्रुवारी रोजी मराठी-हिंदी सिने गीतांचा कार्यक्रम ‘आरोही’ सादर करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमाला नागपूरकर जनतेने हजेरी लावावी, असे आवाहन महिला बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे आणि हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी केले आहे.