Published On : Tue, Feb 4th, 2020

महापौर निधीतून शहरात बनणार ४८ प्रसाधनगृह

Advertisement

महापौरांनी घेतला जागांचा झोननिहाय आढावा

नागपूर: शहरातील बाजार, चौक, गर्दीच्या ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबना होते. शहरातील प्रसाधनगृहांची संख्या तोकडी असल्याने संपूर्ण महापौर निधी प्रसाधनगृहांच्या निर्मितीसाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील दहाही झोनमधील गर्दीच्या व आवश्यक ठिकाणच्या जागेची उपलब्धता लक्षात घेउन ४८ ठिकाणी प्रसाधनगृह बनविण्यात येणार आहेत. यासंबंधी मंगळवारी (ता.४) महापौर संदीप जोशी यांनी झोननिहाय उपलब्ध जागांचा आढावा घेतला.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये आयोजित बैठकीमध्ये महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, हरीश राउत, गणेश राठोड, सहायक आयुक्त स्नेहा करपे व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी नगरसेवक व झोनकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. दहाही झोनमधून प्रसाधनगृहांसाठी एकूण ६८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यानुसार संबंधित ठिकाणची आवश्यकता व जागेची उपलब्धता लक्षात घेउन ४८ ठिकाणी प्रसाधनगृह निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. या प्रसाधनगृहांच्या निर्मितीची जबाबदारी संबंधित एजन्सींना यावेळी देण्यात आली.

प्रसाधनगृह निर्मितीच्या कार्यवाहीला गती द्या
शहर स्वच्छता व नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने शहरात प्रसाधनगृहांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यादृष्टीने संदीप जोशी यांनी महापौर पद स्वीकारताच संपूर्ण महापौर निधी प्रसाधनगृहांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. यासंबंधी त्यांनी वेळोवेळी बैठक बोलावून आढावा घेतला. मंगळवारी (ता.४) झालेल्या बैठकीत झोननिहाय प्रसाधनगृहांची आवश्यकता व उपलब्ध जागेवर प्रसाधनगृह निर्मितीची जबाबदारी संबंधित एजन्सींकडे दिली. ६ कोटी महापौर निधीतून संपूर्ण शहरात ४८ ठिकाणी प्रसाधनगृह बनविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्व प्रसाधनगृहांचे 15 मार्चपूर्वी भूमिपूजन होउन काम सुरू होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement