-मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र, आदेश त्वरित निर्गमित करा
नागपूर: महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याची व ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा विधि मंडळात केली होती. या दोन्ही घोषणांची पूर्तता करण्यासाठी शासन आदेश काढण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
कोरोनामुळे सुरू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात पडून आहे, धान खरेदी बंद, कापूस खरेदी बंद, हरबरा खरेदी बंद, भाजीपाला काही प्रमाणातच विकला जात आहे. अशा आणीबाणीच्या स्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि कर्ज भरलेल्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला तर शेतकऱ्यांची आर्थिक चणचण दूर होईल व त्यांना आर्थिक दिलासा मिळेल.
राज्यात अनेक जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाला नाही. 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभही मिळाला नाही. या दोन्ही घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत केल्या आहेत. या घोषणांचे शासन आदेश त्वरित निर्गमित करण्याची विनंतीही बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.