Published On : Tue, Feb 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : ना. गडकरी

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी आज संसदेत सादर केलेले अंदाजपत्रक देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे आहे. हे अंदाजपत्रक 130 कोटी भारतीयांचे जीवन अधिक सुसह्य करणारे आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच महामार्ग, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतीशी संबंधित महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर करण्यात येत असलेली गुंतवणूक ही मैलाचा दगड असल्याचे सिध्द होईल, असा विश्वास व्यक्त करून ना. गडकरी म्हणाले- 2022-23 मध्ये रस्ते परिवहन मास्टर प्लॉनला अंतिम रुप देण्यासोबतच शहरी भागात सार्वजनिक वाहतूक-परिवहनमध्ये येणार्‍या बदलाला गती देणे, शून्य इंधन नीतीच्या निर्णयांमुळे शहरी क्षेत्राला विशेष गती मिळेल.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अर्थमंत्री श्रीमती सितारामन यांनी या अर्थसंकल्पात पहाडी क्षेत्रात असलेल्या राज्यांमध्ये रोप वे पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यावर जोर दिला आहे. याअंतर्गत 60 किमी लांब 8 रोप वे बनविण्याची योजना आखण्यात आली आहे. रोप वे मार्गातून नवीन पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. यामुळे कोट्यवधी लोकांसाठी वाहतूक सुव्यवस्थित होईल आणि माल वाहतूक खर्चात कपात होईल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

सन 2022 मध्ये 25 हजार किमी रस्ते निर्माण पूर्ण करण्यासोबतच प्रदूषण रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेचे आपण स्वागत करीत आहोत. तसेच शहरांमध्ये बॅटरी अदलाबदल करण्याच्या धोरणावर भर दिला जाईल. त्यामुळे प्रदूषणापासून दिलासा मिळेल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- शेतकरी, महिला आणि युवकांकडे अधिक लक्ष देणार्‍या या अंदाजपत्रकात पीएम गती शक्ती योजनेच्या माध्यमातून विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. सरकारच्या धोरणांमुळे देशभरात प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन मिळेल. तसेच पीपीपी मॉडेल अंतर्गत योजना आणल्या जातील. त्यामुळे शेतकर्‍यांपर्यंत डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचेल व त्याचा शेतकर्‍यांना फायदा होईल, असेही ना. गडकरी म्हणाले.

Advertisement