नागपूर: क्राइम ब्रँचने मोठी कारवाई करत वर्धा रोडवरील डोंगरगाव बस स्टॉपजवळ सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. हा अवैध जुगार गेमिंग पार्लरच्या आड सुरू करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. माहितीनुसार, या छापेमारी दरम्यान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख अखिल शेख बशीर, आसिफ शेख उर्फ सोनू हबीब शेख, मंगेश गजानन भाजीपाले आणि सचिन रमेश रगडे यांचा समावेश आहे. या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी 07 इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन आणि रोख रकमेसह एकूण अडीच लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.यातील मुख्य आरोपी शेख अखिल शेख बशीर हा संपूर्ण जुगार रॅकेटचा प्रमुख संचालक होता. तर, आसिफ शेखला देखरेख आणि आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मंगेश गजानन भाजीपाले येथे काम करत होता, तर सचिन रमेश रगडे गेमिंग मशीनवर सट्टा लावताना रंगेहाथ पकडला गेला.
या घटनेनंतर पोलिसांनी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, या अवैध जुगार रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.