नागपूर: प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर गुरुवार दि. 5 एप्रिल व शुक्रवार दि. 6 एप्रिल रोजी ‘गॅस पंचायत’ चे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये ज्या कुटूंबाकडे गॅसचे कनेक्शन नाही, अशा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
प्रदुषणमुक्त नागपूर जिल्हा करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील मागासवर्गीय कुटूंब, ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, अंत्योदय योजनेतील कुटूंब, दारिद्रय रेषेखालील कुटूंब व आदिवासी तसेच गैर आदिवासी भागातील कुटूंबाकडे गॅस कनेक्शन नाहीत, अशा कुटुंबांना प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.
यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक बाबीची पूर्तता केल्यानंतर ऑईल कंपनीकडून माफक दरात गॅस कनेक्शन वितरीत करण्यात येईल.
शहरी भागात ज्या कुटूंबाकडे गॅस कनेक्शन नाही अशा लाभार्थ्यांना गॅस वितरकांच्या स्तरावर कॅम्पच्या माध्यमातून योजनेत सहभागी करण्यात येणार आहे. अंत्योदय योजनेच्या कुटूंबियांकडे गॅस जोडणी नसेल अशा कुटूंब प्रमुखांनी त्यांचे नाव रास्तभाव दुकानदारांकडे नोंदविणे आवश्यक राहील. सदर यादी तेल कंपनीकडे पाठविण्यात येईल व गॅस कंपनीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत माफक दरात गॅस कनेक्शन वितरण करण्यात येईल.
जिल्हा प्रदूषण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीकरिता हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन व इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.