नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा अतिशय प्राचीन असा इतिहास आहे. उद्या 15 ऑगस्ट 2024 रोजी भारत देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यातच भारताच्या स्वातंत्र्य लढाईत नागपूरच्या क्रांतिकारकांचा मोठा वाटा आहे.
ऐतिहासिक वारसा असलेला (शहीद स्मारक) ‘जुम्मा दरवाजा’ म्हणजेच “गांधीगेट” –
नागपुरातील महाल परीसरात असलेला (शहीद स्मारक) ‘जुम्मा दरवाजा’ म्हणजेच “गांधीगेट” गोंड राजा बख्त बुलंद शाहचा मुलगा चांद सुलतान यांनी बांधलेला आहे. त्यामुळे याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. क्रांतिकारक मंगल पांडे यांनी 10 मे 1857 रोजी मेरठमध्ये ब्रिटीशांच्या विरोधात बंडाचा बिगुल बुलंद केला होता. देशभरात याची ठिणगी पसरली.त्याचे पडसाद नागपुरातही उमटले. इंग्रजांनी शहरातील क्रांतिकारकांना अटक करण्यास सुरुवात केली. पकडलेल्या क्रांतिकारकांना गांधीगेट (जुम्मा दरवाजा) येथे फाशी देण्यात आली. ज्यामध्ये शहीद नवाब कादर खान, सिद्दीक अली खान, अकबर अली खान, विलायत अली खान, बुनियाद अली रिसालदार, युसुफ खान, युनिफॉर्म मेजर, मोईनुद्दीन हुसेन जमादार, इनायतुल्ला खान, मराठा सैनिक वाघले जमादार यांचा समावेश होता. त्यांचे पार्थिव 3 दिवस गांधीगेट येथे तसेच लटकलेल्या अवस्थेत होते. राजवाड्यात असलेले गांधीगेट (जुम्मा दरवाजा) देशाच्या स्वातंत्र्यासाठी 9 वीरांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी त्याचा साक्षीदार आहे. आजही या हुतात्म्यांच्या कबरी सीताबर्डी टेकडी (नौ गाझीच्या नावाने) येथे आहेत.
Nagpur’s Historic ‘Gandhi Gate’ in Mahal: A Tribute to the Sacrifice of Nine Freedom Fighters
महाल येथील ‘गांधीगेट’ची अशी झाली स्थापना-
सन 1735 मध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज (प्रथम) यांनी नागपूरला आपली राजधानी स्थापन केली व राहण्यासाठी भव्य राजवाडा बांधला. ह्य़ा राजवाड्यातच सर्व मंदिरे होती. उदा. पाताळेइवर, नागेडवर, हर हनुमान खिडकी, गणपती व श्री. विठ्ठल रुक्मीनी मंदिर राजवाड्या परिसरातच दुसरे रघुजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत राणी बांकाबाई साहेबांचा पण वाडा होता हा राजवाडा आताचे कोतवाली पुलिस स्टेशन ते डि.डि. नगर विद्यालयाच्या पर्यंत होता अजूनही त्याचे कोरीव काम कायम आहे. डी.डी. नगर विद्यालयात त्यांचे देवघर होते. व राण्यांचे दाग दागीने ठेवण्यासाठी टाके (छोटे तळघर) व खोल्या होत्या. भव्य तलाव पण होता त्यातून राजवाड्याला पाण्याचा पुरवठा केला जात होता. सन 1818 मध्ये ब्रिटीशांनी राजवाड्याला आग लावली ही आग सहा महिने धुमसत होती. त्यावरुन राजवाड्याच्या भव्यतेची कल्पना करता येवू शकते. त्यामुळे राजवाड्याचा बराच भाग जळाला. राजवाड्याचे काही द्वार (गेट) अजुनही दिमाखात उभे आहेत. उदा. कल्याणद्वार, शुक्रवार दरवाजा (गांधी गेट), भुत्या दरवाजा, पत्थरफोड दरवाजा इ. कालांतराने शुक्रवार तलाव, राजवाडा व येथील परिसराला महाल असे नाव पडले. आताच्या महाल भागात मोठा राजवाडा, लहान राजवाडा, किल्ला पॅलेस व बरेचसे जुनेवाडे आहेत. बर्याच्या शाळापण आहेत. डी.डी.नगर, लोकांची शाळा, हिंदू मुलींची शाळा, बिंझाणी कॉलेज इ. आता महाल मध्ये मोठी बाजार पेठ निर्माण झाली आहे.