नागपूर : राज्याचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आगमन ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या पीओपी मूर्तीबाबत नागपूर महापालिका शपथपत्र घेत आहे. या प्रतिज्ञापत्रात मंडळांना पीओपीची मूर्ती बसवणार नसल्याचे लिहावे लागणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही मंडळ नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्याला काळ्या यादीत टाकले जाईल.
काही दिवसांतच गणेशोत्सव सुरू होणार आहे. नागपुरातील हा उत्सव पर्यावरणपूरक राहावा यासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पीओपी मूर्तींबाबत महापालिका सातत्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. या मालिकेत सोमवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यशाळेत मुलांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सर्व साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाला नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.आंचल गोयल यांचीही उपस्थिती होती. या कार्यशाळेत मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन मातीच्या गणेशमूर्ती बनविल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्तांच्या म्हणण्यानुसा, कार्यशाळेत सहभागी होणारी मुले ही ब्रँड ॲम्बेसेडर असून, ते लोकांमध्ये महापालिकेचा संदेश पोहोचवतील. या कार्यशाळेत व्यावसायिक कलाकारही उपस्थित होते ज्यांनी मुलांना गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले.