नागपूर : प्रामाणिकपणाचे उदाहरण सादर करत गणेशपेठ पोलिसांनी रस्ते अपघातातील पीडित व्यक्तीची बॅग त्याच्या कुटुंबीयांना परत केली. या बॅगमध्ये १,५०,६५० रुपये इतकी रक्कम होती. ही घटना १० एप्रिलच्या मध्यरात्री १२:३० दरम्यान सीए रोडवरील दर्शन टॉवरजवळ घडली. ही जागा गणेशपेठ व पांचपावली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येते.
अपघातग्रस्ताची ओळख विजय कुडमेटे (४२) अशी झाली असून ते चीजभवन, नागपूर येथील रहिवासी आहे. अपघातानंतर त्याची बॅग सापडली आणि ती गणेशपेठ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.
पोलिसांनी तत्परतेने त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतल्यानंतर ही बॅग आणि त्यात असलेली १,५०,६५० रोख रक्कम त्यांच्या पत्नी अर्चना विजय कुडमेटे (३६) यांच्याकडे अधिकृत साक्षीदारांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.पोलिसांच्या या तत्परतेचे आणि प्रामाणिकतेचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.