नागपूर : दीड महिन्यापूर्वी देशी कट्ट्याचा धाक दाखवून दारूच्या दुकानातील रोकड लुटणाऱ्या आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून देशी कट्टा तसेच काडतूस जप्त करण्यात झोन पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने यश मिळवले. निशांत ऊर्फ सोनू रामराज विश्वकर्मा (वय २१, रा. कुंदनलाल गुप्ता नगर) असे यातील मुख्य आरोपीचे नाव आहे.
उपायुक्त पोद्दार यांच्या पथकातील पोलीस गस्त करीत असताना त्यांना सोनू कडे पिस्तूल असल्याची माहिती कळाली. त्यावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे देशी पिस्तुल, काडतूस आणि गुप्ती सापडली. त्याला बोलते केले असता त्याने ४ आॅगस्टला पिस्तुलाच्या धाकावर कळमन्यातील दारूचे दुकान लुटल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात सागर रामप्रसाद श्रीवास (कळमना वस्ती), गौरव ननकूराम साहू (इंदिरानगर), अनिकेत ठाकूर (बिनाकी जामदारवाडी) , बिनाकी मंगळवारीत राहणारे पंकज गुप्ता तसेच विकास साहू सहभागी असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांनाही अटक करून कळमना पोलिसांच्या हवाली केले. ही कारवाई पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ओ. एस. सोनटक्के, पीएसआय जितेंद्र ठाकूर, तसेच राजकुमार जनबंधू, महेश बावणे, पंकज लांडे, विनोद सोनटक्के, सूरज भारती, प्रमोद वाघ, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, रवींद्र राऊत आणि मृदुल राऊत यांनी बजावली.
विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीच नागपुरात रुजू झालेल्या उपायुक्त पोद्दार यांनी परिमंडळ पाचमधील अवैध धंदे करणारे आणि कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम आरंभली आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.