नागपूर: शहरातील सर्व दहन घाटांचे सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी मंगळवार (ता.२९) रोजी गंगाबाई घाटाची पाहणी केली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, मनपाच्या प्रतोद दिव्या धुरडे, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक राजेश घोडपागे, विजय चुटेले, नगरसेविका श्रद्धा पाठक, सुमेधा देशपांडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव, पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी संपूर्ण घाटाची पाहणी केली व तेथील पायाभूत सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली. संपूर्ण घाटाचा परिसर पुढील दोन दिवसात स्वच्छ करण्यात यावा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. गंगाबाई घाटालगत असलेल्या सुलभ शौचालयाची पाहणी यावेळी मान्यवरांनी केली. घाटाच्या परिसरात रात्रीच्या वेळी वावर असणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, असे निर्देश दीपराज पार्डीकर यांनी दिले.
घाट परिसरात असलेल्या सूचना फलकावर जुन्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्याजागी नवीन सूचना फलक तातडीने बसविण्यात यावे, असे निर्देश कार्यकारी महापौरांनी दिले. घाटाच्या बाहेरील परिसरात विसावा केंद्रालालगत असलेल्या फुटपाथला भेगा पडलेल्या आहे, काही जागी तो खचला आहे. तो तातडीने दुरूस्त करण्यात यावा, असे निर्देश स्थायी समिती सभापती वीरेद्र कुकरेजा यांनी दिले.
सध्या गंगाबाई घाटात दोन मोठे शोकसभा सभागृह आहे. त्यापैकी एक सभागृह वापरात नाही, त्याचा वापर कसा करता येईल या दृष्टीने विचार करण्यात यावा, अशी सूचना कार्यकारी महापौरांनी केली. दोन्ही शोकसभा सभागृहाचे नूतनीकरण आणि डागडुजी करण्याचा प्रस्ताव तयार करावा, असेही दीपराज पार्डीकर यांनी सांगितले. घाटामधील काष्ठ गोदाम, डिझेल शव दाहिनी, स्वच्छता गृह याची देखील पाहणी मान्यवरांनी केली. घाटावर अद्ययावत विद्युत व्यवस्था आणि एल.ई.डी लाईट्स बसविण्यात यावे, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. घाट परिसरात असलेल्या उद्यानाला विकसित करावे आणि त्या जागी उद्यान विभागामार्फत विविध झाडे लावण्यात यावी, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.
गंगाबाई घाटालगत असलेल्या दफन घाटाची पाहणी यावेळी मान्यवरांनी केली. दफन घाटावर अस्वच्छता दिसून आल्यामुळे कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी नाराजी व्यक्त केली व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दफन घाटाचे समतलीकरण करावे आणि माती काढणाऱ्यांना एक प्रमाणमात्र शुल्काचा दर ठरवून देण्यात यावा, असे निर्देश दीपराज पार्डीकर यांनी दिले.
यावेळी गांधीबाग झोनचे कनिष्ठ अभियंता रवी बुंदाडे, झोनल अधिकारी सुरेश खरे, स्वास्थ निरिक्षक रोहिदास राठोड, आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.