नागपूर : प्रतापनगरातील चार गुंडांनी एका पंक्चरवाल्याच्या हत्येचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचे दुकान पेटवून दिले. या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहमद सादिक अन्सारी (वय २३) असे फिर्यादीचे नाव असून तो जयताळा परिसरात राहतो. प्रतापनगरातील राधे मंगल कार्यालयाच्या समोर त्याचे पंक्चरचे दुकान आहे.
शुक्रवारी रात्री ८.४५ च्या सुमारास चिंटू मरस्कोल्हे, राकेश मरस्कोल्हे आणि त्याचे दोन साथीदार सादिकच्या दुकानावर आले. त्यांनी सादिकसोबत वाद घालून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या मागे चाकू घेऊन धावले. जीव मुठीत घेऊन पळाल्यामुळे सादिक वाचला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आरोपींनी त्याच्या पंक्चरच्या दुकानाला आग लावून पेटवून दिले.
यामुळे गरीब सादिकचे ६५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दुकान पेटवल्याची घटना शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर सादिकने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विविध कलमानुसार आरोपी मरस्कोल्हे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.