नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारागृहात परत एकदा गँगवॉर घडल्याची घटना समोर आली आहे. कारागृहातील बॅरेक क्रमांक तीनमध्ये कुख्यात गुंड चेतन हजारे याच्यावर दुसऱ्या कैद्याने टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला तो गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, कुख्यात गुंड चेतन हजारे हा बाल्या बिनेकर हत्याकांडाचा आरोपी असून तो बॅरेक क्रमांक तीनमध्ये कैद आहे. त्याच्याच बॅरेकमध्ये समीर अहमद सगीर अहमद हा आरोपीदेखील आहे. कारागृहात चेतन हजारेने आपली दहशत निर्माण करत इतर कैद्यांवर आपले वर्चस्व निर्माण करत होता. हीच गोष्ट अहमद सगीर अहमद याला खटकली. कारागृह प्रशासनाने दोघांनाही एकाच बॅरेकमध्ये ठेवले. सोमवारी पहाटे त्यांच्यात वाद झाला.
हा वाद इतका चिघळला की दोघांमध्ये मारपीट झाली. यादरम्यान समीरने हजारेच्या पाठ व हातावर वार केले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बॅरेकमध्ये शिरत दोघांना वेगळे केले. जखमी चेतनला कारागृहाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच कारागृहाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी धंतोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी समीर अहमदविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि कारागृह कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.