नागपूर : पोलिसांनी गांजा विक्रेत्याच्या घरावर छापा टाकून एका आरोपीला रंगेहात पकडले.
तर या प्रकरणात सहभागी असलेल्या महिलेसह तीन आरोपी फरार झाले. याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सिद्धार्थ राजू धमगाये (३८, रा. रामा नगर कामठी) असे अटक केलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे. फरार आरोपींमध्ये निक्की नावाची महिला आणि तिचे सहकारी सलमान आणि मोहित यांचा समावेश आहे.
माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पोलिस ठाण्याच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की सिद्धार्थ हा गांजा विक्रीचा व्यवसाय करत असून त्याने बब्बू आसिफ अली नावाच्या व्यक्तीच्या घरी गांजा लपवून ठेवला होता. पोलिसांनी घराला वेढा घातला. कारवाईदरम्यान सिद्धार्थच्या ताब्यातून 5 किलो 964 ग्रॅम गांजा (किंमत 60 हजार रुपये) जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने सांगितले की, तो निक्की, सलमान आणि मोहित नावाच्या मित्रांच्या मदतीने गांजा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. सिद्धार्थला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयातून कोठडी सुनावण्यात आली आहे.तर पोलिसांनी फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.