गडचिरोली: हेडरी पोलीस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात नक्षलवाद्यांकडून गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून नक्षलवाद्यांनी गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकाली. तसेच नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ एक पत्रकही टाकले आहे. लालसू वेलदा (६३, रा. टिटोळा ता. एटापल्ली) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे.
गाव पाटील लालसू वेलदा हे स्वत:च्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले. लालसू यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासमोरच त्यांची हत्या करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जि.प. सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे. हत्येनंतर घटनास्थळी पत्रक आढळले. त्यात सुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजन कमेटीने केला आहे. यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
गाव पाटलाच्या हत्येनंतर गावात पोलिसांचा फैजफ़ाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा योग्य तो तपास करण्यात येईल,असे गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.