नागपूर: घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस अनधिकृतपणे कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. कपीलनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई दिपक टायर चौक, नारी रोड, प्लॉट नं. ४९ येथे केली.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर घटनास्थळी छापा टाकण्यात आला.या कारवाईत मोहनसिंग जगदीशसिंग (२४) आणि विष्णुकुमार कुलदीपसिंग रेहार (२२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही मूळचे ढोलपूर (राजस्थान) येथील असून सध्या नागपूरमध्ये हरजिंदर सिंग यांच्या घरी किरायाने राहत होते.
आरोपी हे सिव्हील लाईन येथील एका डोमेस्टीक गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरीचे काम करत असून, घरगुती वापराच्या एच.पी. गॅस सिलेंडरमधून नोझलच्या सहाय्याने कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत असल्याचे आढळून आले. ते दर सिलेंडरमधून १ ते २ किलो गॅस चोरून अनधिकृतपणे कमर्शियल वापरासाठी वापरत होते.
पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या साहित्यासह एकूण २५ गॅस सिलेंडर (एचपी – १७, भारत – ७, इंडेन – १), २ ट्रान्सफर नोझल, १ इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण रु. ३,७६,७०० चा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोउपनि योगेश नाल्टे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कपीलनगर येथे सपोनि अमोल ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींवर कलम २८७ भा.दं.वि., सह कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम, तसेच तरल पेट्रोलियम गॅस विनियमन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.