नागपूर: झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातूनही विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची माहिती अखेरच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रशासनाने प्रामाणिकपणे करावे. जेणेकरून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापती श्रीमती चेतना टांक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीची बैठक गुरुवार २९ जून रोजी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात पार पडली. बैठकीला सभापती चेतना टांक यांच्यासह उपसभापती वंदना यंगटवार, समितीचे सदस्य रुतिका मसराम, मंगला खेकरे, स्नेहा निकोसे, सुनील हिरणवार, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, सहायक आयुक्त राजेश कराडे, हरिश राऊत, प्रकाश वऱ्हाडे, उपविभागीय (एसआरए) अभियंता राहाटे उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम मागील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा आढावा घेण्यात आला. शासनातर्फे आणि मनपातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दर्शविणारे फलक प्रत्येक झोनस्तरावर, नगरसेवकांच्या घरासमोर आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी लावण्याच्या सूचना सभापती चेतना टांक यांनी केल्या. गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीअंतर्गत काय-काय योजना किंवा उपक्रम राबविले जातात याची माहिती समिती सदस्य सुनील हिरणवार यांनी अधिकाऱ्यांना मागितली तर उपसभापती वंदना यंगटवार यांनी घरकुल योजनेबद्दलची माहिती अधिकाऱ्यांना मागितली.
कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांनी रमाई आवास योजनेची तर श्री. राहाटे यांनी पंतप्रधान आवाज योजनेची माहिती समिती सदस्यांना दिली. गलिच्छ वस्ती समितीअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ पोहचविण्यासाठी आणि अन्य काही चांगले उपक्रम राबविण्यासाठी प्रशासनाकडून चांगल्या सूचना अपेक्षित आहेत. प्रशासनाचे सहकार्यही अपेक्षित असल्याची अपेक्षा सभापती चेतना टांक यांनी व्यक्त केली. पुढील बैठकीत संपूर्ण तयारीसह आणि चांगल्या सूचनांसह अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश श्रीमती चेतना टांक यांनी दिले.