Published On : Sat, Aug 11th, 2018

‘गिफ्ट मिल्क’मुळे सुटणार शेतकऱ्यांसह कुपोषणाचा प्रश्न

Advertisement

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या दुधाविषयीच्या समस्यांना दिलासा मिळेल, शिवाय राज्यात ऐरणीवर असलेल्या बालकांच्या कुपोषणाचाही प्रश्न सुटेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) पुढाकाराने मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लि़मिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत शनिवारी (ता. ११) मनपाच्या हनुमान नगर येथील लाल बहादुर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे ऊर्जा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ‘गिफ्ट मिल्क’ उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी बोलत होते.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, आमदार नागो गाणार, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती भारती बुंडे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, हनुमान नगर झोन सभापती रुपाली ठाकुर, नेहरु नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका उषा पॅलट, स्वाती आखतकर, प्रमिला मंथरानी, शितल कामडी, कल्पना कुंभलकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेचे रामलाल चौधरी, लाल बहादुर हिंदी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. दरम्यान मनपाच्या लाल बहादुर हिंदी माध्यमिक शाळेसह दुर्गानगर हायस्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राज्यात विशेषत: विदर्भात कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचाही आलेख चढता आहे. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळतात. ही गंभीर समस्या असून यापासून दिलासा मिळावा यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरतो. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पौष्टीक दुध देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ राखले जाईल, यासोबतच शेतकऱ्यांच्या दुधालाही योग्य दर मिळून ते आत्महत्येसारखा विचारच मनातून काढून टाकतील, हा या मागचा उद्देश आहे. यासारखा उपक्रम संपूर्ण राज्यासह देशातही सुरू करण्यात आल्यास दुध उत्पादक व बालकांच्या विकासात मोठे परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाढदिवसाला दुधाचे वितरण करा
विदर्भातून सुमारे अडीच लाख दुधाचे उत्पादन होते. या दुधाचा योग्य उपयोग करून ‘गिफ्ट मिल्क’सारखे उपक्रम व मदर डेअरी मार्फत दुधाचे विविध पदार्थ तयार करून विक्री केली तर महिन्याला सुमारे ५ कोटी व वर्षाला सुमारे ६० कोटींचा नफा आपल्या विदर्भातील शेतऱ्यांना होईल. आज विदर्भात सर्वत्रच मदर डेअरीचे स्टॉल्स सुरू होत आहेत. यामार्फत नागरिकांना शुद्ध् दुधाचे पदार्थ स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. २७ मे ला वाढदिवसानिमित्त भक्ती निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांनाच आपण मदर डेअरीचे दुध दिले.

आपणही सर्वांनी वाढदिवस व अन्य समारंभात इतर पेय देण्यापेक्षा दुधाचे वितरण केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईलच शिवाय आपले आरोग्य सुदृढ राहिल. मुख्य म्हणजे आपण हा पुढाकार घेतल्यास विदर्भातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही. मनपाच्या सर्व नगरसेवकांनी वाढदिवसाला दुध वाटप करून एका चांगल्या उपक्रमाची सुरूवात करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाजनको परिसरातील शाळांमध्ये उपक्रम सुरू करणार : पालकमंत्री बावनकुळे
एनडीडीबच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला हा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. जिल्हा परिषद, आदिवासी विभाग, महानगरपालिका व समाजकल्याण विभागाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या उपक्रमाचा खुप फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता, महाजनकोच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळांमध्येही लवकरच हा उपक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

‘गिफ्ट मिल्क’ उपक्रमांतर्गत महानरपालिकेच्या लाल बहादुर हिंदी माध्यमिक शाळेसह जिल्हा परिषदेच्या १३, आदिवासी विभागाच्या ११ व समाजकल्याण विभागाच्या एका अशा एकूण २१ शाळांमध्ये शनिवार (ता. ११)पासून या उपक्रमाला सुरूवात झाली. एनडीडीबीचे कार्यकारी संचालक वाय.वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन प्रित गांधी यांनी केले तर आभार अमिताभ मुखर्जी यांनी मानले. कार्यक्रमाला मनपा शाळेतील शिक्षकांसह मनपा जिल्हा परिषद, एनडीडीबीच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांसह मनपा शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Advertisement
Advertisement