Published On : Wed, May 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

पैसे द्या, तुम्हाला मंत्री करतो, भाजप अध्यक्षांच्या नावाने आमदारांना आमिष !

- आरोपीला गुजरातमधून अटक
Advertisement

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे आणि भाजप सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून मंत्रीपदासाठी सर्व आमदार प्रयत्नशील आहे. मात्र यातच आता धक्कादायक माहिती समोर आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावाने देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रकार उघडकीस आला आहे. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत राज्य किंवा केंद्रात मंत्रीपद मिळवून देतो असा दावा करत आमदारांना कोट्यवधींची मागणी केली.

भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तडकाफडकी आरोपीचा छडा लावत नीरज सिंह राठोडला (मोरबी, अहमदाबाद) गुजरातमधून अटक केली. या प्रकारामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Gold Rate
09 April 2025
Gold 24 KT 89,200/-
Gold 22 KT 83,000/-
Silver / Kg - 90,400/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार राठोड याने भाजपच्या सहा आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केले होते. यात मध्य नागपूरचे आ.विकास कुंभारे, कामठीचे आ.टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आ.नारायण कुचे, तसेच गोवा येथील आ. प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आ. बाशा चँग यांचा समावेश आहे.

मागील दोन आठवड्यांपूर्वी विकास कुंभारे यांना नीरज सिंह राठोड याचा फोन आला. त्याने जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत तुमचे नाव मंत्रीपदासाठी सुरू असून तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर त्याने अगोदर १.६६ लाख व नंतर आणखी लागले तर पैसे देण्यासाठी तयार रहा असे सांगितले. राठोड यांच्याकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच कुंभारे यांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

राज्यात कधी मंत्रीपदाबाबत विचारणा झाली नसताना अचानक दिल्लीहून अशी विचारणा होते व पैसे मागितले जात असल्याने कुंभारे यांना संशय आला. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता असे काहीच नसल्याचे संगीतले. कुंभारे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फसवणुकीसंदर्भात माहिती दिली.

नीरजने कुंभारे यांना केलेल्या प्रत्येक फोनमध्ये मंत्रीपदाच्या बदल्यात पक्षनिधीसाठी पैसे द्यावे लागतील असे म्हटले. पक्षनिधीवर त्याचा जास्त जोर असायचा व त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आमदारांना त्याचा संशय आला, असे कुंभारे यांनी सांगितले. त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चक्क एक लिंकदेखील त्यांना पाठविली होती, असेही ते म्हणाले.

तसेच तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नीरजला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. नीरजला नागपुरात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने केवळ हेच सहा आमदार नव्हे तर भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क साधला असल्याची शक्यता आहे. याप्रकारामागे आणखी कोणाचा हात आहे याबात पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Advertisement
Advertisement