नागपूर/भंडारा: जनतेला पाच वर्षासाठी असलेला खासदार हवा आहे, आठ महिन्यांसाठी नाही. या निवडणुकीनंतर विरोधकांचा खासदार बदलणार आहे. पण भाजपाचा उमेदवार मात्र 8 महिने आणि पुढील पाच वर्षासाठी राहणार आहे. त्यामुळेच या क्षेत्राचा मजबूत आणि सक्षम विकास होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.
गोंदिया ग्रामीण भागातील कुडवा, कटंगी, नागरा, पांढराबोडी, कोटी आदी भागात कार्यकर्त्यांशी संपर्क करून पालकमंत्र्यांनी संवाद साधला. भाजपाचे शक्तीस्थळ असलेल्या बुथप्रमुखांपासून ते जिल्हाध्यक्ष आणि आमदारांपर्यंत सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकींना भाजपनेते विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, अशोक इंगळे, भावना कदम, दीपक कदम, सीताबाई रहांगडाले, शैलजा सोनवणे, छत्रपाल तुरकर, कुणाल भिसे, देवेंद्र भिसे, कमलेश्वरी लिल्हारे, भाऊराव उके, तेजस तोडवानी, चंद्रिकापुरे, इंद्राणी रहांगडाले, जमईवार आदी उपस्थित होते.
या सर्व बैठकांमध्ये पालकमंत्री व आ. पुराम यांनी कार्यकर्त्यांच्या कामाचा आणि नियोजनाचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना नियोजनाची माहिती दिली. कोणत्याही स्थितीत मतदान अधिक झाले पाहिजे. मतदानासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. दररोज सायंकाळी 3 तास कार्यकर्त्यांनी जनतेच्या, मतदारांच्या संपर्कासाठी द्यावेत. कार्यकर्त्यांचे हे तीन तास भाजपाचा खासदार निवडून देणार आहेत. त्यानंतर या भागात विकासाची गंगा वाहील. आठ महिन्यांसाठी येणारा खासदार काय देणार आहे? असा प्रश्नही पालकमंत्र्यांनी उपस्थित केला.
गावोगावातील सर्व मतदारांशी संपर्क करा आणि त्यांना कमळाचे बटन दाबण्यास सांगा, अशी सूचना देताना पालकमंत्री म्हणाले- आजची लढाई जिंकली की 20 वर्षे आपल्याला कुणीच येथून हटवू शकणार नाही, हे लक्षात घ्या. राजकीय परिवर्तनाची ही संधी लक्षात घ्या. ही संधी या भागाच्या विकासाला नवीन कलाटणी देणारी ठरणार आहे. जनतेचा विश्वासघात करून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडणार्या माजी खासदाराला सरळ घरीच पोहोचवा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.