नागपूर: महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या नियोजन समितीचा निधी अजून बव्हंशी विभागानी खर्च केला आणि तो खर्च करण्यासाठी शासकीय आदेशही निघाले नाहीत. नागपूरला उपराजधानीचा विशेष दर्जा असल्यामुळे दरवर्षी 900 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने द्यावा अशी मागणी आ. बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व भाजप आमदारांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात नियोजन समितीच्या कामाचे आणि निधी मुदतीत खर्च करण्याचे प्रशासकीय आदेश जूनमध्येच काढले जात होते. मात्र आता फक्त 2 महिने शिल्लक असताना अजूनही या सरकारच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी अखर्चित आहे. आता कधी पैसा खर्च होईल याबद्दल शंका आहे. जिल्हाधिकार्यांनीही म्हटले आहे की, निधी खर्च करू, पण कसा खर्च होणार असा सवालही आ. बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.
नागपूर उपराजधानी असल्यामुळे जास्त निधी या शहराच्या विकासासाठी दिला पाहिजे. मागच्या सरकारने सर्वसाधारण योजनेसाठी 525 कोटी रुपये दिले होते. आदिवासी योजनेसाठी 75 कोटी तर एसईपीसाठी 200 कोटी दिले होते. एकूण 800 कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले होते. गेल्या वर्षी मविआ सरकारने 400 कोटी रुपये फक्त दिले. 75 कोटी एसईपी व आदिवासींसाठी 35 कोटी दिले. एकूण 250 कोटी कमी निधी दिला. 2021-22 मध्येही शासनाने कमी निधी दिला. या जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने 700 कोटी सर्वसाधारण, 200 कोटी एसईपी व 75 कोटी आदिवासी क्षेत्रासाठी दिला पाहिजे अशी सर्व आमदारांची मागणी आहे. एकूण 900 कोटी रुपये निधी दिला पाहिजे, याकडेही आ. बावनकुळे यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे उपस्थित होते.
पटोलेंचा ‘तो’ गावगुंड
कुठे आहे : आ. बावनकुळे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मोदी’ नावाचा गावगुंड आमच्या भागात आहे. त्याला उद्देशून मी बोललो आणि पोलिसांनी त्या गावगुंडाला पकडले आहे, असेही वक्तव्य त्यांनी दिले. पण ‘तो’ गावगुंड कुठे आहे. त्याला पटोले यांनी जनतेसमोर, माध्यमासमोर, पोलिसांसमोर का आणले नाही असा सवाल उपस्थित करून आ. बावनकुळे म्हणाले- पोलिसांनी मात्र असा गावगुंड सापडला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे पटोले नेमके कोणत्या गावगुंडाबद्दल बोलतात?
नाना पटोलेंचे राजकीय जीवन पाहिले तर असे वाटते की, परमेश्वराने एक जीव खोटे बोलण्यासाठीच पाठवला आहे. आतापर्यंत जेवढी पदे त्यांना मिळाली ती खोटे बोलूनच त्यांनी मिळविली असावीत. काँग्रेसमध्ये एवढे ज्येष्ठ व प्रामाणिक नेते असताना सोनियाजींनी पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद कसे दिले याचे मला आश्चर्य वाटते असेही आ. बावनकुळे यांनी म्हटले आहे.
येत्या 7 दिवस आम्ही पोलिसांची वाट पाहू, आठव्या दिवशी कलम 156 (3) अन्वये न्यायालयात याचिका दाखल करू पण नाना पटोलेवर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही आ. बावनकुळे यांनी दिला आहे.