नागपूर: भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा आपण प्रयत्न करू. आपण संघटनेत कार्य करून इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात सर्व नेत्यांच्या सहकार्याने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्थायी समितीचे सभापती म्हणून कार्य करू, या शब्दात मनपा स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित झाल्यानंतर आयोजित पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. मंचावर भाजपचे शहर अध्यक्ष तथा दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, आमदार डॉ. परिणय फुके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मावळते स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपाचे पक्षनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक तथा विश्वस्त भूषण शिंगणे, श्रीमती राखी कुकरेजा, साई गोविंदराव आश्रमाचे भाई पहेलाराम उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना भाजपचे शहर अध्यक्ष तथा दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विरेंद्र कुकरेजा यांच्यावर पक्षाने सोपविलेली जबाबदारी ते सार्थ ठरवतील. मुंबईत विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही एवढ्या मोठ्या संख्येत या कार्यक्रमाला आमदारांची असलेली उपस्थिती म्हणजे आमचेही महापालिकेकडे लक्ष आहे, याची ग्वाही देते. महापालिकेचे शासनाकडे थकीत असलेली रक्कम सर्व आमदार प्रयत्न करून महापालिकेच्या तिजोरीत जमा करतील. यासाठी स्थायी समिती सभापतींना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, बऱ्याच वर्षानंतर स्थायी समितीमध्ये उत्तर नागपूरला प्रतिनिधित्व मिळाले, ही आनंदाची बाब आहे. या निमित्ताने उत्तर नागपुरात भाजप मजबूत होईल, असा आम्हाला विश्वास आहे. स्थायी समितीच्या माध्यमातून उत्तर नागपूरसोबतच नवनिर्वाचित स्थायी समिती सभापतींना संपूर्ण नागपुरातील विकासकामांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार गिरीश व्यास म्हणाले, विक्की कुकरेजा हे आज नागपुरातील आघाडीचे व्यावसायिक आहेत. आपला व्यवसाय त्यांनी त्यांच्या मेहनतीने उच्चस्थानी नेला तसेच महापालिकेला एका वेगळ्या उंचीवर ते घेऊन जातील यात शंका नाही. विक्की कुकरेजा यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. त्यांच्या वडिलधाऱ्यांच्या नेतृत्त्वात आम्हीही काम केले आहे. त्यांच्या घरात मिळालेला राजकारणाचा अनुभव ते महापालिकेसाठी या शहराच्या विकासासाठी कामात आणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महापालिका ही शहरातील जनतेची पालक आहे. नागरिकांनी जर आपला मालमत्ता कर व अन्य कर वेळेत भरले तर महापालिकेच्या माध्यमातून उत्तमोत्तम नागरी सुविधा जनतेला पुरविणे सोयीचे होईल. स्थायी समितीच्या सभापतींवर या संपूर्ण अर्थकारणाचा ताळमेळ बसविण्याची जबाबदारी असते. विक्की कुकरेजा यांच्या व्यवसायातला अनुभव दांडगा आहे. महापालिकेला त्यांच्या या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल, असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी महापौर नंदा जिचकार आणि भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार सुधाकर कोहळे यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित नागरिकांनीही त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. प्रास्ताविकातून मावळते सभापती संदीप जाधव यांनी वर्षभरातील त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. संचालन नगरसेविका तसेच भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे यांनी केले. आभार नगरसेवक सुनील हिरणवार यांनी मानले.
यावेळी मंचावर स्थायी समितीचे आजी-माजी सदस्य सुनील हिरणवार, शेषराव गोतमारे, महेश महाजन, हर्षला साबळे, लता काडगाये, सरला नायक, नेहा वाघमारे, जयश्री वाडीभस्मे, मंगला खेकरे, सोनाली कडू, संगीता गिऱ्हे, सुभाष पारधी, मनीषा अतकरे उपस्थित होते.
संदीप जाधव यांच्याकडून कुकरेजा यांनी स्वीकारला पदभार
कार्यक्रमानंतर स्थायी समिती सभापतींच्या कक्षात नवनिर्वाचित सभापती विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांनी मावळते सभापती संदीप जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी प्रारंभी विक्की कुकरेजा यांनी संदीप जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर संदीप जाधव यांनी कुकरेजा यांचा सत्कार केला. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आमदार कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, घनश्याम कुकरेजा, डॉ. विंकी रुग्वानी, जयप्रकाश गुप्ता, प्रताप मोटवानी व मनपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे मनपातील उपनेते
पदग्रहण सोहळ्यात भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष तथा आमदार सुधाकर कोहळे यांनी नगरसेवक बाल्या बोरकर, नगरसेविका वर्षा ठाकरे आणि हे मनपातील पक्षाचे नवे उपनेते राहतील, अशी घोषणा केली.