लेवा समाजात लेखनाची परंपरा अशिक्षित असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्यापासून सुरुवात झाली. त्या कालखंडामध्ये त्यांच्या काव्याला फारसे महत्त्व नव्हते पण आजच्या काळात संपूर्ण जगात त्यांचा नावलौकिक झालेला आहे. बहिणाबाई चौधरी यांनी केलेल्या कवितांवर आज अनेक विद्यार्थी पीएचडी करीत आहेत.
अशिक्षीत असलेल्या बहिणाबाई चौधरी यांचं नाव एका नामांकित विद्यापीठाला देण्यात आलं. उपस्थित सर्व साहित्यिकांना आवाहन करतो की पुढील कालखंडात एक वेळ अशी आली पाहिजे की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा लेवा समाजाचा झाला पाहिजे.” असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी केले. खेमचंद पाटील लिखित लेवा साहित्यिक रत्ने या आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांच्या वतीने प्रकाशित पुस्तकाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की “पुढील कालखंडात आपली मातृभाषा , लेवा गणबोली टिकवायची असेल तर लिखाण करून आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून समाजाला मार्गदर्शन व दिशा द्यावी”
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की ” डोंबिवली एक साहित्यिक नगरी आहे आणि त्या नगरी मध्ये खेमचंद पाटील यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लेवा साहित्यिकाना एकत्र आणून त्यांचा सन्मान करण्याचे काम या पुस्तकाच्या निमित्ताने केले. ही आपल्या लेवा समाजासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे”
पुस्तकाचे प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते डॉ राम नेमाडे यांनी नवोदित साहित्यिकांना सल्ला देताना सांगितले की , ” तुम्ही जरूर लिहा. तुम्हाला हिणवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. पण जेव्हा तुम्ही लिहिता त्यापूर्वी तुम्ही कुसुमाग्रज, बोरकर, अत्रे आणि इतर जुन्या कवींच्या कविता वाचा त्यांचे साहित्य अभ्यासा, त्यांच्या भाषेचा दर्जा विचारात घ्या आणि आपण त्याच्या जवळपास आहोत का त्याचा विचार करा आणि लिखाण करा म्हणजे दर्जेदार साहित्य निर्मिती होईल”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तकाचे प्रकाशक हेमंत नेहेते तर साहित्यपूर्ण भाषेतून अप्रतिम असे सूत्रसंचालन डॉ योगेश जोशी यांनी केले. लेवा साहित्यिक रत्ने या पुस्तकाचे प्रकाशन डॉ राम नेमाडे आणि क्रांतीगाथा स्वातंत्र्याची या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मान्यवरांचे उपस्थितीत केले. त्यावेळी व्यासपीठावर व्याकरणाचार्य शास्त्री भक्ती किशोरदासजी, यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी, प्रा. डॉ. गुणवंत भंगाळे, उद्योजक रत्नाकर चौधरी, उद्योजक राजेंद्र पाटील व शिक्षण सेवाव्रती डॉ सुनील खर्डीकर यांच्यासह अनेक उद्योजक व साहित्यिक उपस्थित होते. या प्रसंगी लेवा समाजातील साहित्यिकांचा लेवा साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला.
हे पुस्तक साहित्यिक क्षेत्रात नावारूपास येईल.या जगतात साहित्य हे एखाद्या सूर्यासारखे असते, जसा सूर्य अंधकाराचा नाश करतो तसा साहित्य रूपी सूर्य मानवाच्या कुबुद्धीचा नाश करत” असे प्रतिपादन व्याकरणाचार्य शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांनी या प्रसंगी बोलताना केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहेते, सचिव डॉ योगेश जोशी व उपाध्यक्ष डॉ सुनील खर्डीकर, लेखक ,संपादक खेमचंद पाटील , मिलिंद इंगळे, नितीन चौधरी , हेमलता चौधरी , निता नेहेते, नयना इंगळे यांनी परिश्रम घेतले.