अमरावती : अजित पवार हे आपल्या समर्थक नेत्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या राजकीय घडामोडीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.
नव्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांची मोठी गोची झाली आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आपण भाजपला पाठिंबा दिला होता. आता अजित पवार हे पुन्हा निधी खेचून घेतील, आमच्या निर्णयात आडवे येतील अशी भीती आहे. त्यामुळे या आमदारांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे कडू म्हणाले.
आम्ही सरकारमधील घटक पक्ष आहोत, राष्ट्रवादीला सोबत घेण्याअगोदर भाजपने आमच्याशी चर्चा करायला हवी होती. मात्र तसे काहीही झाले नसल्याचे कडू म्हणाले. भाजपला सरकारमध्ये समर्थकांची संख्या वाढवायची आहे, ते त्यांनी जरूर करावे, पण जुन्या लोकांचाही विश्वासघात होणार नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे. जर भाजपने असे केले नाही तर भविष्यात त्याचे परिणाम दिसून येतील , असे कडू म्हणाले.
दुसऱ्या लोकांना सोबत घेताना पहिल्या लोकांना खड्ड्यात टाकायचे, ही भूमिका राजकारणात टिकत नाही. मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांची समजूत काढली असली, तरी हा तात्पुरता उपचार आहे, एकदा मनात शंका निर्माण झाली, की ती दूर होणे कठीण असल्याचेही ते म्हणाले.