अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्धा-अमरावती सीमेजवळ अमरावती ग्रामीण पोलीस आणि एसएसटीच्या पथकाने मंगळवारी मोठी कारवाई केली.
नागपूरहून अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या मिनी मालवाहू वाहनाची पोलीस पथकाने तपासणी केली असता त्यात ५ कोटी १७ लाख रुपये किमतीचे सोने-चांदी जप्त करण्यात आली. यासोबतच ‘सिक्वल ग्लोबल प्रेशियस लॉजिस्टिक’ कंपनीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात या मालासह काही बिलेही सादर करण्यात आली आहेत. मात्र कागदपत्रांच्या सत्यतेची खातरजमा करण्यासाठी तिवसा पोलिसांनी हा माल आपल्या ताब्यात घेतला आहे. आयकर विभाग आणि निवडणूक विभागही या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर सक्रिय पोलीस व महसूल विभागाच्या चौक्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. हे सोने-चांदी कोणाकडे आणि कोठे पाठवले जात होते, याचा तपास पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरु करण्यात आला आहे.