नागपूर : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन पतधोरण जाहीर केले. ८ ते १० ऑगस्टदरम्यान झालेल्या चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. समितीने रेपो दर तिसऱ्यांदा कायम ठेवला आहे.
सध्या रेपो दर ६.५ टक्केच राहील. ६ सदस्यीय चलन विषयक धोरण समितीत रेपो रेट व्यतिरिक्त देशातील वाढती महागाई, अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. आरबीआयने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता.
फेब्रुवारीमध्ये चलन विषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. येत्या तीन महिन्यात रेपो दर कमी होण्याची आशा नाही. या वर्षाच्या शेवटी रिटेल चलनवाढीचा दर आरबीआयच्या उद्दिष्टापर्यंत आला तर केंद्रीय बँक पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपूर्वी रेपो दर कमी करणार नाही. याचा अर्थ तोपर्यंत तुमचा ईएमआय सध्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.