Published On : Mon, Jan 15th, 2018

सद्भावना एकता रॅलीस सांगलीकरांचा उदंड प्रतिसाद

Advertisement

सांगली: जिल्हा प्रशासनाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या सद्भावना एकता रॅलीस समाजातील सर्व घटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनाने रॅली आयोजित केली असली तरी ती केवळ शासकीय रॅली ठरली नाही, तर लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला, सामान्य नागरिक यांचा उदंड प्रतिसाद या रॅलीला मिळाला. सांगलीकरांनी सद्भावनेचा इतिहास घडवला.

समाजसुधारकांच्या विविध वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, रॅलीची विहीत वेळेत प्रारंभ व सांगता, शिस्तबद्ध संचलन, देशभक्तीपर गीतांनी निर्माण झालेले देशभक्तीचे वातावरण, रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाची एकतेची भावना, मिले सुर मेरा तुम्हारा गीताचे उठावदार सादरीकरण ही या रॅलीची वैशिष्ट्ये ठरली.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रॅली सुरू होण्यापूर्वी हवेत फुगे सोडून शांततेचा संदेश देण्यात आला. दिव्यांग विद्यार्थिनीने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीची सुरुवात झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, खासदार अमर साबळे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, महापौर हारूण शिकलगार, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, श्री.वीरकर आणि यांच्यासह समस्त सांगलीकरांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला.

सकाळी पावणेदहा वाजता पुष्कराज चौक सांगली येथून सुरू झालेली रॅली राम मंदिर – पंचमुखी मारूती रस्ता – गरवारे महाविद्यालय – महानगरपालिका – राजवाडा चौक मार्गे निघून शिवाजी स्टेडियममध्ये या रॅलीची सांगता झाली. रॅलीच्या प्रारंभी राष्ट्रध्वज, त्यानंतर विविध वेशभूषेतील विद्यार्थी, पोलीस बँड, शाळांचे विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी आणि नागरिक अशा क्रमाने रॅली शिस्तबद्धपणे संपन्न झाली. रॅलीच्या 3.2 किलोमीटर मार्गामध्ये सामाजिक एकतेच्या घोषणांनी सांगली शहर दुमदूमून सोडले.

सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित या रॅलीमध्ये समाजातील विविध घटकांच्या सहभागामुळे एकतेसाठी एक नवचैतन्य निर्माण झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकतेची भावना उठून आली होती. या रॅलीला विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला तसेच, प्रत्यक्ष रॅलीमध्ये सहभागी झाले. या सर्वांच्या सहभागामुळे रॅली निर्विघ्नपणे पार पडून यशस्वी झाली. यातून समाजात दुही फैलावणाऱ्या समाजकंटकांना चोख संदेश दिला गेला.

सांगली जिल्हा प्रशासनाने सामाजिक सद्भावना रॅली यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे अभिनंदन करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राची सामाजिक वीण पक्की आहे. मात्र, त्याला गेल्या काही दिवसामध्ये ज्या विविध घटना घडल्या, त्यातून थोडासा धक्का बसला. त्या पार्श्वभूमिवर सांगली जिल्हा प्रशासनाने सामाजिक सद्भावना रॅली आयोजित करून विद्यार्थ्यांबरोबर सर्व जाती धर्माच्या नागरिकांमध्ये जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. आम्ही सर्व एक आहोत, ही भावना घट्ट करण्याचा प्रयत्न केला. हे राज्यासाठी आदर्श ठरेल, असे सांगली मॉडेल सर्वांपुढे ठेवले आहे, असे प्रशंसोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ही सामाजिक एकतेची ज्योत सतत प्रज्वलित रहावी, असे आवाहन करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी जिंदगी है छोटी, उम्मीदे बडी है, देखो नजर के सामने, ये सद्भावना यात्रा खडी है, असा शेर सांगलीकरांना अर्पण करून सांगलीकर बंधू भगिनी, वरिष्ठ व सांगलीच्या जनतेचे आभार मानले.

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले, या रॅलीमुळे सांगलीकरांच्या नव्या वर्षाची सुरवात रचनात्मक, सकारात्मक झाली आहे. आपणाला आपापसामध्ये नव्हे तर देशासाठी लढायचे आहे. तिरंगा हाच आपला धर्म आहे. त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता कायम राहील, यासाठी आयोजित या रॅलीच्या माध्यमातून एकसंघतेचा हुंकार, एकतेचा बुलंद आवाज प्रतिध्वनीत झाला आहे. यासाठी सांगलीकरांना मानाचा मुजरा आहे, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांनी स्तब्ध उभे राहून शहिदांप्रती आदरांजली व्यक्त केली. शिवाजी स्टेडिअमवर 30 x 15 मीटर स्टेजवर मिले सुर मेरा तुम्हारा या गीताचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर रंगीबेरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.

पुष्कराज चौक ते शिवाजी स्टेडिअम काढण्यात आलेल्या या रॅलीत माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आणि भगवानराव साळुंखे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपमहापौर विजय घाडगे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, नीता केळकर, गोपीचंद पडळकर, शेखर माने, जयश्री पाटील, पृथ्वीराज पवार, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी, मान्यवर, विविध 16 ते 17 शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्काऊट, गाईडचे विद्यार्थी, एन. सी. सी. चे कॅडेटस्, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संघटना, हजारोंच्या संख्येने सांगलीकर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

ही रॅली यशस्वी करण्यासाठी गेले आठवडाभर जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपायुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, मिरजचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार आणि सर्व विभागांचे विभाग प्रमुख, तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

रॅलीवर महानगरपालिकेच्या वतीने एकूण 17, पोलीस विभागाच्या वतीने 20 आणि दोन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर होती. रॅलीमार्गामध्ये संदेशवहनासाठी वॉकीटॉकीचा वापर करण्यात आला. तसेच, स्वयंसेवकांनीही स्वयंस्फूर्तीने मदत केली. महानगरपालिकेच्या वतीने रॅलीमार्गावर 11 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, 8 ठिकाणी फिरत्या शौचालयाची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था करण्यात आली होती. 11 अग्निशमन वाहने आणि 3 रूग्णवाहिकांचीही व्यवस्था, वैद्यकीय पथकेही ठेवण्यात आली होती रॅलीसाठी 500 पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही रॅली यशस्वी करून सांगलीकरांनी सामाजिक समता, एकता, अखंडतेचा संदेश सर्वदूर पोहोचविला आहे.

Advertisement